Indian Railways News => Topic started by railenquiry on Aug 04, 2012 - 21:00:18 PM


Title - - गणेशोत्सवासाठी 60 विशेष गाड्या
Posted by : railenquiry on Aug 04, 2012 - 21:00:18 PM

कणकवली - गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा 60 विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे. यात 15 सप्टेंबर ते 30 ऑक्‍टोबर या कालावधीत दररोज सीएसटी ते मडगाव व मडगाव ते सीएसटी अशी विशेष गाडी धावणार आहे. वीस डब्यांची विनाआरक्षित विशेष गाडी 14 सप्टेंबर ते 4 ऑक्‍टोबरदरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव आणि मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस अशी धावणार आहे. या गाड्यांचे आरक्षण 5 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

यंदा 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. या कालावधीत मुंबईहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्वच गाड्यांचे आरक्षण आधीच फुल्ल झाले आहे. प्रत्येक गाडीचे सरासरी सहाशे ते एक हजारपर्यंत वेटिंग असल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने दरवर्षीप्रमाणे यंदाही दोन विशेष गाड्या सप्टेंबर मन्यिात सोडण्याचे जाहीर केले आहे. सिंधुदुर्गातील झाराप वगळता उर्वरित सर्व स्थानकांवर या गाड्या थांबणार आहेत.

मुंबई सीएसटी स्थानकाहून सुटणारी 01013 सीएसटी ते मडगाव ही गाडी 15 सप्टेंबर ते 3 ऑक्‍टोबरपर्यंत दररोज धावणार आहे. सीएसटी स्थानकातून मध्यरात्री 12.20 ला सुटणारी ही गाडी मडगाव येथे दुपारी 2.10 वाजता पोहोचणार आहे, तर परतीची 01014 ही सीएसटी मडगाव विशेष गाडी मडगाव येथून दुपारी 2.40 वाजता सुटणार आहे. ती दुसऱ्या दिवशी पहाटे 05.15 वाजता सीएसटी स्थानकात थांबणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, मडुरे येथे ही गाडी थांबणार आहे. या गाडीला 18 डब्बे असून त्यात 10 स्लिपर, 2 अेसी थ्री टायर, 1 एसी टू टायर, 3 जनरल आणि 2 एसएलआर अशी स्थिती आहे.

मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरून सुटणारी 01403 या क्रमांकाची गाडी 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30 सप्टेंबर आणि 02 व 04 सप्टेंबरला लोकमान्य टिळक स्थानकावरून मध्यरात्री 12.50 वाजता सुटणार आहे, तर परतीची मडगाव-लोकमान्य टिळक ही 01404 या क्रमांकाची गाडी मडगाव येथून सायंकाळी 4 वाजता सुटून मुंबईल सकाळी 8.10 वाजता पोचणार आहे. वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, मडुरे येथे ही गाडी थांबणार आहे. ही गाडी संपूर्णत: अनारक्षित असून, 20 डब्बे आहेत. यात 18 सिटिंग कोच आणि दोन एसएलआर आहेत.

उपनगरवासीयांना प्रतीक्षा

कोकणातील चाकरमानी अंधेरी ते विरार या पट्ट्यात मोठ्या संख्येने राहतात. या प्रवाशांसाठी पश्‍चिम रेल्वे दरवर्षी अहमदाबाद-विरार ते मडगाव अशी जादा गाडी सोडते. यंदा त्याबाबत अद्याप घोषणा झाली नसल्याने उपनगरवासीयांना या विशेष गाडीची अद्याप प्रतीक्षा आहे.