| मध्य रेल्वेच्या स्थानकांत आता लिफ्टही by irmafia on 01 June, 2013 - 03:00 PM | ||
|---|---|---|
irmafia | मध्य रेल्वेच्या स्थानकांत आता लिफ्टही on 01 June, 2013 - 03:00 PM | |
मुंबई – रेल्वे प्रवाशांचा जिने चढण्याचा त्रास कमी व्हावा, यासाठी रेल्वे स्थानकांमध्ये सरकते जिने बसवण्याची संकल्पना पुढे आली. सध्या मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकात सरकते जिने बसवले जात आहेत. त्यातच आता रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेवरील प्रवाशांना आणखी एक खूशखबर दिली आहे. मध्य रेल्वेच्या काही स्थानकांमध्ये २७ लिफ्ट बसवण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता लिफ्टच्या सहायाने फलाटांवर जाता येणार आहे. सरकत्या जिन्यांबरोबरच रेल्वे स्थानकांमध्ये लिफ्ट बसवण्याची घोषणा रेल्वेने अर्थसंकल्पात केली होती. त्यानुसार मध्य रेल्वेवरील स्थानकांसाठी २७ लिफ्ट रेल्वे बोर्डाने मंजुर केल्या आहेत. त्यानुसार दादर स्थानकात सहा, सीएसटी स्थानकात पाच, कल्याण स्थानकात पाच, ठाणे तीन लिफ्ट बसवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर डोंबिवली, घाटकोपर, लोकमान्य टिळक टर्मिनस, आणि लोणावळा या स्थानकांत प्रत्येकी दोन लिफ्ट बसवण्यात येतील. काही लिफ्टमध्ये एकावेळी २० जणांना तर इतर काही लिफ्टमध्ये १३ जणांना वाहून नेण्याची क्षमता असेल. सरकत्या जिन्यांबाबत मुंबईकरांमध्ये उत्सुकता असून, ठाणे स्थानकातील जिने येत्या दहा जून रोजी कार्यन्वित होतील. त्याचबरोबर मध्य रेल्वेच्या सात स्थानकांमध्ये आणखी २६ सरकते जिने बसवण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार दादर आणि ठाणे स्थानकांत प्रत्येकी सहा, कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये प्रत्येकी चार सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. तसेच डोंबिवली, घाटकोपर, लोणावळा या स्थानकांत प्रत्येकी दोन सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. सरकते जिने आणि लिफ्ट लवकरात लवकर बसवण्याचा मध्य रेल्वेचा मानस आहे. त्यादृष्टीने या पुढे कामे केली जाणार आहेत. जेणे करून प्रवाशांना अधिक सोयी-सुविधा उपलब्ध होतील, असे माहीतगारांनी सांगितले. | ||