Indian Railways News => Topic started by railgenie on May 18, 2013 - 09:00:09 AM


Title - एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी साखळीखेच
Posted by : railgenie on May 18, 2013 - 09:00:09 AM

उन्हाळ्याची सुट्टी असल्याने सध्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी असते . या गर्दीत एक्स्प्रेस सुटताना सर्वच प्रवाशांना गाडीत प्रवेश करता येतोच असे नाही . या मागे राहिलेल्या प्रवाशांनाही एक्स्प्रेसमध्ये चढता यावे यासाठी साखळी ओढून गाडी थांबवली जात आहे . मध्य रेल्वेवरील सीएसटी , टिळक टर्मिनस आणि कल्याण स्टेशनवर हे गैरप्रकार गेल्या काही दिवसांत वाढले असून त्यामुळे ' रेल्वे सुरक्षा बल ' ( आरपीएफ ) जेरीला आले आहे . हे साखळी खेचण्याचे प्रकार कसे रोखायचे , याचा प्रश्न रेल्वे पोलिसांना पडला आहे .

अतोनात गर्दी , अरुंद दरवाजे , प्रवाशांना डोईजड ठरणारे लगेज ... या साऱ्यांत एक्स्प्रेस सुटली तरीही काही प्रवासी प्लॅटफॉर्मवर उभेच राहतात . या पै - पाहुण्यांना गाडीत चढता यावे , यासाठी एक्स्प्रेसमधील प्रवासीच प्लॅटफॉर्मवरच राहिलेल्या सहप्रवाशांसाठी बिनदिक्क्तपणे एक्स्प्रेसची साखळी ओढण्याचा सोपा मार्ग पत्करत आहेत .

मार्चमध्ये १३४ , एप्रिलमध्ये १३५ प्रकार

यावर्षी प्रामुख्याने मार्च आणि एप्रिलमध्ये साखळी खेचण्याच्या प्रकारात प्रचंड वाढ झाली आहे . मार्चमध्ये १३४ वेळा वेगवेगळ्या एक्स्प्रेसची साखळी खेचण्यात आली . त्यापैकी , केवळ २८ वेळाच अस्सल कारणांसाठी साखळी ओढली होती . उर्वरित वेळा सहप्रवाशांना एक्स्प्रेसमध्ये चढता यावे , या उद्देशाने साखळी ओढल्याचे ' आरपीएफ ' च्या तपासात आढळले आहे . एप्रिलमध्ये १३५ वेळा साखळी ओढली गेली . त्यापैकी योग्य कारणांसाठी फक्त ३५ वेळा साखळी ओढली गेली . ' आरपीएफ ' ने मार्चमधील साखळी खेचण्याचे २४ गुन्हे आणि एप्रिलमध्ये १७ गुन्हे उघडकीस आणले आहेत .

लोकलही रखडतात

साखळी खेचल्याने ' एक्स्प्रेस ' ला काही काळ जागीच थांबावे लागते . त्यामुळे ' एक्स्प्रेस ' ला सुटायला उशीर होतो . परिणामी लोकल गाड्यांही रखतात आणि त्यांच्या वेळापत्रकावरही होत असल्याने उपनगरीय प्रवाशांचे हाल होत आहेत .