Indian Railways News => Topic started by puneetmafia on May 30, 2013 - 00:01:21 AM


Title - कोकण रेल्वेत अनधिकृत विक्रेत्यांचा सुळसुळाट | PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
Posted by : puneetmafia on May 30, 2013 - 00:01:21 AM

चिपळूण - ऐन गर्दीच्या हंगामात कोकण रेल्वे मार्गावर धावणा-या रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. विशेष करून पनवेल ते मडगाव दरम्यान थेट रेल्वे गाडीमध्ये शिरून हे अनधिकृत विक्रेते व्यवसाय करीत आहेत. मात्र, कोकण रेल्वे पोलिस मूग गिळून गप्प आहेत.
या ठिकाणी फळ व भाजी विक्रेते, चहा, वडापाव व अन्य पदार्थ आणि खेळणी विकणारेसुद्धा अनधिकृतपणे रेल्वेतून धंदा करीत आहेत. रेल्वे प्रशासनाने विक्रेत्यांसाठी पासेस दिले आहेत. तसेच रेल्वे स्टेशनवर असणा-या कॅन्टीन मालकांना मर्यादित विक्रेते ठेवण्याचे बंधन आहे. व त्यांनाच पासेस देण्यात आले आहेत. मात्र, अनेक कॅन्टीनधारक मर्यादेपेक्षा अधिक विक्रेते ठेवत आहेत.
याशिवाय अनेक विक्रेते उन्हाळी हंगाम लक्षात घेऊन रेल्वेमध्ये शिरून विक्री करीत आहेत. मात्र, रेल्वे प्रशासनाने याची दखलच घेतलेली नाही. रेल्वे पोलिसांनी याकडे डोळेझाक केली असून, प्रवाशांना गर्दीमध्ये या फेरीवाल्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.
रेल्वेमध्ये विकण्यात येणा-या बाटलीबंद पाण्याच्या दर्जाबाबतही शंका व्यक्त होत आहे. काही विक्रेते नदीचे पाणी भरून बाटलीला स्टीकर लावून पाणी विकतात, अशा तक्रारीही येत आहेत. मात्र, याकडे रेल्वे पोलिस कानाडोळा करीत आहेत. गर्दीच्या हंगामात प्रवाशांना धक्का देत प्रसंगी तुडवत हे विक्रेते ट्रेनमध्ये फिरतात.
अनेकवेळा गुंगीचे पदार्थ देऊन प्रवाशांना लुटण्याचे प्रकार होत आहेत. गर्दीतून प्रवासी बाहेर फेकले जाऊन अपघातही होत आहेत. रेल्वे प्रशासनाने ज्या विक्रेत्यांना फक्त गाडय़ांच्या खिडक्यांमधून आपली सेवा देण्याचे बंधन आहे. मात्र, या नियमाचा पायमल्ली हे विक्रेते रेल्वेमध्ये मोठी गर्दी करीत आहेत.
एकामागून एक येणारे चहा, कॉफी, वडापाव, भजी, आम्लेट, सॅण्डविच, फळे, पाणी बॉटल्स, थंड पेय तसेच बिर्याणी, उपमा, शिरा असे विक्रेते रेल्वेगाडय़ांमध्ये गर्दी करीत आहेत. विक्रेते मोठय़ाने आरडाओरड करत थेट आरक्षण डब्यातही प्रवेश करीत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, याबाबत रेल्वेचे टीसी, संबंधित अधिकारी आणि पोलिससुद्धा गप्प आहेत, त्यामुळे अशा विक्रेत्यांना आवर घालण्याची मागणी नागरिक करत आहेत