Indian Railways News => Topic started by railgenie on Feb 09, 2013 - 16:00:17 PM


Title - क्रूरकर्मा अफझल गुरुला फाशी
Posted by : railgenie on Feb 09, 2013 - 16:00:17 PM

संसदेवर २००१ मध्ये झालेल्या हल्ल्याचा मास्टर माइंड, जैश-ए-मोहंम्मदचा खतरनाक अतिरेकी आणि कसाबनंतर देशाचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या क्रूरक्रर्मा अफझल गुरूला अखेर १२ वर्षांनी फासावर लटकवण्यात आले आहे. आज सकाळी ८ वाजता दिल्लीतील तिहार जेलमध्ये अफझलला फाशी देण्यात आली. जेलमधील कर्मचाऱ्यांनाही कुणकुण न लागू देता अत्यंत गुप्तपणे अफझलचा खेळ खल्लास करण्यात आला. फाशीनंतर श्रीनगरमध्ये कर्फ्यू लावण्यात आला असून काश्मीरसह देशभरात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व गृहसचिव आर. के. सिंह यांनी अफझलच्या फाशीला दुजोरा दिला आहे. ४३ वर्षीय अफझलची फाशी हे भारतात दहशत माजवणाऱ्या अतिरेकी संघटना आणि पाकिस्तानसाठी खणखणीत उत्तर असल्याचे मानले जात आहे. तिहार जेलमधील जेल क्र. ३ मध्ये अफझलला फाशी देण्यात आली. यावेळी काही मोजकेच अधिकारी तेथे होते. ही कारवाई गुप्त रहावी म्हणून सर्वच अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल बंद ठेवले होते. शुक्रवारी संध्याकाळी गृहमंत्रालयाची तातडीची बैठक झाली. त्यात अफझलच्या फाशीवर निर्णय घेताना सर्व ऑपरेशनची आखणी करण्यात आली.

मुंबई हल्ल्यातील पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबला फाशी देण्यात आल्यानंतर अफझल गुरूला फाशी कधी ?, असा प्रश्न विचारला जात होता. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र अफझलला योग्य वेळी फाशी देण्यात येईल, असे सूचक वक्तव्य तेव्हा केले होते. अफझलच्या फाशीच्या फाईलचा अभ्यास करून शिंदे यांनी वेगाने पावले उचलायला सुरूवात केली होती. दरम्यान, राष्ट्रपतींनी ३ फेब्रुवारी रोजी अफझलच्या दयेचा पुनर्विचाराचा अर्ज फेटाळला आणि खऱ्या अर्थाने अफझलच्या गळ्याभोवती फास आवळला गेला. राष्ट्रपतींकडून सिग्नल मिळाल्यानंतर अवघ्या सहा दिवसातच अफझल फासावर लटकला.

तिहारमध्येच दफन केले

मुंबई हल्ल्यातील अतिरेकी कसाबला २१ नोव्हेंबर २०१२ रोजी फाशी देण्यात आल्यानंतर पुण्याच्या येरवडा तुरूंगातच दफन करण्यात आले होते. अफझललाही फाशीनंतर तिहार जेलमध्येच ९ वाजून ७ मिनिटांनी दफन करण्यात आले आहे. त्याच्यावर मुस्लिम धर्माच्या प्रथेनुसार दफनविधी करण्यात आला. यावेळी मौलवीही हजर होते. त्याआधी पहाटेच जेलमध्ये फाशी दिली त्या बराकच्या जवळ कबर खोदण्यात आली होती. फाशीनंतर डॉक्टरांनी अफझलला मृत घोषित करताच त्याला दफन करण्यात आले.