Indian Railways News => Topic started by greatindian on Jul 09, 2013 - 08:00:18 AM


Title - चीनच्या माजी रेल्वेमंत्र्यास भ्रष्टाचारप्रकरणी मृत्युदंड
Posted by : greatindian on Jul 09, 2013 - 08:00:18 AM

बीजिंग - भ्रष्टाचार व अधिकारांच्या गैरवापर केल्याप्रकरणी चीनच्या माजी रेल्वे मंत्र्यास न्यायालयाने आज (सोमवार) मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. माजी रेल्वेमंत्री लिऊ झीजून यांना येथील न्यायालयाने गेल्या 25 वर्षांत सुमारे साडे दहा दशलक्ष डॉलर्सचा गैरव्यवहार केल्या प्रकरणी मृत्युदंड सुनावल्याचे वृत्त येथील सरकारप्रणित वृत्तसंस्थेने दिले आहे.

मात्र, या मृत्युदंडाच्या शिक्षेबरोबरच लिऊ यांच्या शिक्षेचा दोन वर्षांनी न्यायालयीन आढावा घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. लिऊ हे 2003 ते 2011 या काळात रेल्वेमंत्री होते. या काळात चीनमधील विविध भागांना वेगवान रेल्वेंच्या सहाय्याने जोडण्याचा प्रकल्प चीनने हाती घेतला होता.

मृत्युदंडाच्या शिक्षेबरोबरच, लिऊ यांचे सर्व राजकीय हक्क रद्दबातल ठरविण्यात आले असून त्यांची सर्व खासगी मालमत्ताही जप्त करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. यांबरोबरच, रेल्वेमंत्री असताना आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याप्रकरणी लिऊ यांना 10 वर्षे कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. चीनचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देशातील भ्रष्टाचाराचा मुद्दा हा चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या जीवनमरणाचा मुद्दा असल्याचे विधान काही दिवसांपूर्वी केले होते. या समस्येविरोधात लढण्याची गरज असल्याचेही शी यांनी स्पष्ट केले होते.

या पार्श्‍वभूमीवर न्यायालयाचा हा निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. लिऊ यांच्याबरोबरच इतरही अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.