Indian Railways News => Topic started by railgenie on Feb 13, 2013 - 16:00:06 PM


Title - चीनमधून 10 रेल्वेगाड्या मुंबईत दाखल
Posted by : railgenie on Feb 13, 2013 - 16:00:06 PM

मुंबई - मुंबईतील पहिल्या मेट्रो प्रकल्पाच्या पुलाचे बांधकाम 99 टक्के पूर्ण झाले असून, रेल्वेरूळ बसविण्याचे कामही 90 टक्के पूर्ण झालेले आहे. इतकेच नव्हे, तर मेट्रो सेवेचे कामकाज आणि देखभालीसाठी आवश्‍यक असलेला कर्मचारीवर्ग भरण्याचे कामही पूर्ण झालेले असून, त्यांना सध्या प्रशिक्षण दिले जात आहे. याशिवाय आतापर्यंत 10 नव्या कोऱ्या करकरीत मेट्रो गाड्या मुंबईत दाखल झालेल्या असून, मार्चअखेरपर्यंत आणखी सहा गाड्या दाखल होणार आहेत, अशी माहिती "मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड'च्या (एमएमओपीएल) सूत्रांनी "सकाळ'ला दिली. त्यामुळे वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील 11.40 किलोमीटरची ही पहिली मेट्रो सेवा आता दृष्टिपथात आल्याचे संकेत मिळाले आहेत.

या मेट्रो-वन प्रकल्पाचा कार डेपो असलेल्या अंधेरीतील डी. एन. नगर भागात "मेट्रो' चालविण्याची चाचणी यापूर्वीच सुरू झालेली आहे. आतापर्यंत तीन किलोमीटरपर्यंत चाचणी झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. मेट्रो चालविण्यासाठी आवश्‍यक असलेली यंत्रसामग्री मुंबईत दाखल झालेली आहे. मेट्रो स्थानकांचे 90 टक्के काम पूर्ण झालेले असून, आता या स्थानकांत छत उभारणे, तसेच अन्य आवश्‍यक कामांना सुरुवात झाली आहे. संपूर्ण मेट्रो रेलमार्गावर सिग्नलिंग आणि दूरसंचारची यंत्रणा उभारण्याचे काम जोमात सुरू आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पश्‍चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकाजवळ रेल्वेरुळांवर मेट्रो पूल उभारण्याचे अत्यंत किचकट कामही आता पूर्ण झाले आहे. या पुलाचे दिव्य पार पाडताना पश्‍चिम रेल्वेच्या वाहतुकीत अजिबात अडथळा न आणता एकही ब्लॉकशिवाय हे काम झाले, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असे या संदर्भात माहिती देताना आवर्जून नमूद केले. मेट्रोच्या काही टप्प्यांतील चाचण्या यापूर्वीच सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे अंतिम चाचणीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्‍यता असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

तिकीट महागणार?
मार्च 2012 पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित असलेल्या "मेट्रो-वन'चे काम विविध कारणांनी रेंगाळल्याने खर्च 20,356 कोटी रुपयांवरून तब्बल 3,893 कोटी रुपयांवर गेला आहे. त्यामुळे मेट्रोचे तिकीट आता महागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या प्रकल्पाबाबत 2005 मध्ये एमएमआरडीएचा "एमएमओपीएल'शी झालेल्या कराराप्रमाणे तिकीट हे बेस्ट बस सेवेच्या तिकिटाच्या दीड पट राहणार होते. यात दर चार वर्षांनी 11 टक्के वाढ करण्याचेही ठरले होते. आता खर्च वाढल्याने त्याची भरपाई कशी करायची, याबाबत सरकार पातळीवर खल सुरू आहे.

गेल्या महिन्यात दिल्लीतील एका बैठकीतही या प्रकल्पासंदर्भात झालेल्या चर्चेत वाढलेला खर्च आणि त्याची भरपाई यावरच चर्चा झाल्याचे समजते. सध्या महागाईमुळे "बेस्ट' बसचे वर्सोवा ते घाटकोपरपर्यंतचे तिकीट भाडे 15 रुपये झालेले आहे. त्या अनुषंगाने करारानुसार- मेट्रोचे भाडेही त्याच्या दीड पट म्हणजे 22 ते 24 रुपयांपर्यंत असू शकते, असे सूत्रांनी सांगितले.