Indian Railways News => Topic started by messanger on Jul 24, 2013 - 00:00:28 AM


Title - चौथ्या दिवशीही रेल्वेला विलंब
Posted by : messanger on Jul 24, 2013 - 00:00:28 AM

नाशिकरोड

वर्धा नागपूर रेल्वे मार्गाच्या रुळाखालील भराव वाहून गेल्याने नागपूरकडे जाणारी वाहतूक कोलमडली असून सलग चौथ्या दिवशीही परिस्थिती आटोक्यात न आल्याने अनेक गाड्यांचे मार्ग बदलले आहेत तर काही गाड्या उशिराने धावत आहे. नाशिकरोड स्थानकावर मार्ग पूर्ववत कधी होईल याबाबत माहिती देण्यात येत नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

नाशिकरोड स्थानकांवरून अनेक प्रवासी नागपूरकडे प्रवास करतात नाशिकडून नागपूरकडे जाणाऱ्यांची संख्या एक हजारापर्यंत आहे. या प्रवाशांना नागपूरकडे जाणारी वाहतूक कोलमडल्याचा फटका बसत असून अनेक प्रवाशांनी बसने प्रवासाला प्राधान्य दिले आहे. नाशिकरोड स्थानकावर मुंबईहून नाशिकरोडकडे येणारी विशाखापट्टणम एक्सप्रेस चार तास उशिराने तर मुंबई हावडा गीतांजली एक्सप्रेस दीड तास उशिराने आली. या गाड्या मुंबईतच उशिरा पोहचल्याने तेथून निघण्यास उशिर झाल्याचे सांगण्यात आले तर नागपूरहून नाशिककडे येणारी सेवाग्राम एक्सप्रेस नऊ तास उशिरा तर विदर्भ एक्सप्रेस चार तास उशिरा आली. नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या इटारसीहून वळवण्यात आल्या आल्याने नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांनी आपली पाऊले बसकडे वळविली आहेत. कुठलीही घोषणा होत नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या मार्गावरील एक लाइन रविवारपर्यंत सुरू होण्याची शक्यता विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी वर्तवली होती; परंतु पावसामुळे कामात व्यत्यय येत असल्याने कामात सुधारणा होऊ शकलेली नाही. भुसावळकडून नागपूरकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच प्रवाशांचे हाल झाले. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही स्थिती कायम होती. रविवारी भुसावळहून नागपूरकडे जाणाऱ्या १८ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. या गाड्या भुसावळहून इटारसीमार्गे नागपूरकडे वळवण्यात आल्या आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने मार्ग बदललेल्या गाड्या लवकरच नियोजित वेळापत्रकानुसार धावण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. दरम्यान, अचानक मार्गात बदल झाल्यामुळे नाशिकहून नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहे.