Indian Railways News => Topic started by railenquiry on Jun 03, 2013 - 00:01:16 AM


Title - टाळ्यांच्या कडकडाटात दख्खनच्या राणीचे स्वागत
Posted by : railenquiry on Jun 03, 2013 - 00:01:16 AM

पुणे - रात्रीपासूनच पाना-फुलांनी नटलेली "ती' सर्वांना भेटायला उत्सुक होती. तिला भेटण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. नेहमीच्या वेळेपेक्षा आज तीही जरा लवकरच आली. तिच्या भेटीसाठी आतुर झालेल्यांनी शिट्ट्या, टाळ्या अन्‌ तिच्या नावाचा जयघोष करीत संपूर्ण रेल्वे स्थानक परिसर दणाणून सोडला. निमित्त होते अनेक वर्षांपासून पुणेकरांची सेवा करणारी "दख्खनच्या राणी' अर्थात "डेक्कन क्वीन'च्या 83 व्या वाढदिवसाचे!

वाढदिवसानिमित्त या राणीला फुलांनी सजविण्यात आले होते. अनेक प्रवासी, आजी-माजी चालक, रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनीच स्थानकावर पहाटेपासून गर्दी केली होती. राणीच्या आगमनानंतर रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा, रेल्वेचे निवृत्त चालक अनिल तोरणे, चालक रत्नपारखी यांनी इंजिनाची पूजा करून 83 किलो वजनाचा केक कापला. या प्रसंगी पुणे-मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे हेमंत टपाले, चारुलता कुलकर्णी, माधुरी पांडे, सीमा गाडगीळ, अनिल गुंजाळ, अरुण पोरवाल, बंडू गोसावी, जयंत गिरमे आदी उपस्थित होते.

वॉल्टझ्‌ म्युझिक ऍकॅडमीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी गाणी व नृत्य सादर केले. "मंकी हिल' येथील माकडांसाठी केळी व कबुतरांसाठी खाद्य पाठविण्यात आले. तसेच, रेल्वे पोलिसांच्या "डॉग स्क्वॉड'मधील श्‍वानांचाही या वेळी गौरव करण्यात आला. रेल्वेचे स्टेशन उपप्रबंधक बी. व्ही. पाटील, आयआरसीटीसीचे प्रमुख तायडे या वेळी उपस्थित होते.