Indian Railways News => Topic started by riteshexpert on Jul 20, 2013 - 20:00:03 PM


Title - दिघा आणि बोनकोडे या नव्या दोन रेल्वे स्थानकांची निर्मिती
Posted by : riteshexpert on Jul 20, 2013 - 20:00:03 PM

सिडको व रेल्वे प्रशासनांचा निर्णय

मनोज जालनावाला , नवी मुंबई

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेली दिघा आणि बोनकोडे रेल्वे स्टेशन्स उभारण्याचा निर्णय सिडको आणि रेल्वे प्रशासनाने घेतला आहे .

ही स्टेशने उभारण्यात यावी , अशी मागणी खा . डॉ . संजीव नाईक यांनी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने केली होती . त्याअनुषंगाने खासदार संजीव नाईक , आमदार संदीप नाईक यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत बुधवारी सायंकाळी बोनकोडे रेल्वे स्थानक उभारणी संदर्भात जागेचा पाहणी दौरा केला . बोनकोडे रेल्वे स्थानकाचा आराखडा तयार करण्याचे काम अल्पावधीतच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती खा . संजीव नाईक यांनी दिली .

ठाणे - वाशी ट्रान्स हार्बर मार्गावर दिघा आणि बोनकोडे या नव्या दोन स्थानकांची निर्मिती करावी या मागणीसाठी खा . संजीव नाईक यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे . काही दिवसांपुर्वी रेल्वे मुख्य प्रबंधकांसमवेत झालेल्या बैठकीत या रेल्वे स्थानकांच्या सर्व्हेक्षणाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे . त्यानंतर बुधवारी खा . संजीव नाईक , आ . संदीप नाईक यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बोनकोडे रेल्वे स्थानक उभारण्या संदर्भात नियोजित करण्यात आलेल्या जागेची तसेच इतर सोयी सुविधा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून लगतच्या परिसराची पाहणी केली . सिडको महामंडळ बोनकोडे रेल्वे स्थानकाची उभारणी करणार आहे .

पावणे - महापे एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या नोकरदारांना कोपरखैरणे किंवा तुर्भे नाका येथे जाऊन पर्यायी रिक्षा किंवा परिवहन बस , खाजगी बस मधून नियोजित ठिकाणी जावे लागत असल्याची बाब खासदार संजीव नाईक यांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे बोनकोडे येथे रेल्वे स्थानक उभारण्यासाठी रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली .

पावणे नाका येथील पुलालगतची जागा बोनकोडे रेल्वे स्थानकासाठी निश्चित करण्यात आली आहे . या स्थानकाच्या उभारणी संदर्भात लवकरच आराखडा तयार करण्यात येणार आहे . सिडको निर्मित नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानके रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्याचा करार करण्यात आला आहे . आगामी कालावधीत कोपरखैरणे , बोनकोडे , महापे आणि तुर्भे एमआयडीसी येथील वाढती लोकसंख्या पाहता बोनकोडे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आधुनिक पद्धतीचे बोनकोडे रेल्वे स्थानक उभारण्यात येणार आहे , असे खा . संजीव नाईक यांनी सांगितले . कोपरखैरणे , एमआयडीसी विभागाकरिता बोनकोडे रेल्वे स्थानक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने कोपरीगाव आणि पावणे हायवेच्या दिशेने अशी दोन प्लॅटफॉर्म याठिकाणी उभारण्यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांनी पाहणी केली .

रेल्वे स्थानक जागा पाहणी दौऱ्यात नवी मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे प्रमुख दिनेश पारख , नगरसेवक नवीन गवते , नगरसेविका मोनिका पाटील , नगरसेविका अॅड . अपर्णा गवते , रेल्वेचे चीफ कमर्शियल इन्सपेक्टर राजीव रंजन , सीएमए अधिकारी बी . बी . तपस्वी आदी उपस्थित होते .