Indian Railways News => Topic started by sushil on May 03, 2013 - 06:00:18 AM


Title - धुळे-मुंबई स्वतंत्र रेल्वे सुरू करा
Posted by : sushil on May 03, 2013 - 06:00:18 AM

नाशिक

उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयाने धुळे ते मुंबई एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी केली . केंद्रीय रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांची भेट घेत सोनवणे यांनी धुळे - मुंबई एक्स्प्रेससह विविध मागण्यांचे निवेदन सादर केले .

उत्तर महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक नाशिक , भुसावळ तसेच मुंबई परिसरात जाण्यासाठी रेल्वेचा वापर करतात . भुसावळ ते मुंबई दरम्यान असलेल्या रेल्वेच्या तुलनेत धुळ्यातून भुसावळ व मुंबईकडे जाण्यासाठी जास्त ट्रेन नाहीत . या असुविधेबद्दल धुळेकरांकडून सतत तक्रारही करण्यात येते . याबाबत खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांची भेट घेत या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली . सोनवणे यांनी बन्सल यांना दिलेल्या निवेदनात उत्तर महाराष्ट्रातील प्रवासीसंख्या लक्षात घेऊन धुळे ते मुंबई स्वतंत्र रेल्वे सुरू करण्याची मागणी केली . त्याचबरोबर ही रेल्वे भुसावळ , मनमाड व नाशिकमार्गे मुंबईला न्यावी , असेही सुचविण्यात आले . तसेच अलाहाबादमार्गे धावणाऱ्या मुंबई - हावडा मेलला भगवान महावीर एक्स्प्रेस असे नाव देण्याचे रेल्वे मंत्रालयातर्फे मान्य करण्यात आले असताना त्यावर कुठलीही कार्यवाही होत नसल्याबद्दल सोनवणे यांनी नाराजी व्यक्त केली . मनमाड - इंदूर रेल्वेमार्गासाठी लवकरात लवकर निधी देण्याची मागणीही सोनवणे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली .