Indian Railways News => Topic started by irmafia on Aug 08, 2013 - 17:59:33 PM


Title - पुणे-दौंड लोहमार्गाचे पन्नास टक्के काम पूर्ण
Posted by : irmafia on Aug 08, 2013 - 17:59:33 PM

पुणे - लोणावळ्याहून थेट दौंडपर्यंत लोकल जाणाऱ्या प्रकल्पातील एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे. पुणे-दौंड लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम 50 टक्‍क्‍यांहून अधिक पूर्ण झाले आहे. वर्षभरात काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

पुणे-दौंड लोहमार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामासाठी मध्य रेल्वेने 167 कोटी रुपयांची तरतूद केली असून, जानेवारीमध्ये कामाला प्रारंभ झाला. विद्युतीकरणाच्या कामात विजेचे खांब उभारण्यासाठी पाया तयार करावा लागतो. त्याला वेळ लागतो. हे काम 70 टक्के पूर्ण झाल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागातील सूत्रांनी दिली.

खांब उभारल्यानंतर त्याला विद्युत जनित्रांनी जोडले जाईल, त्यातून विद्युतीकरणाचे काम पूर्ण होईल. काम पूर्ण झाल्यावर लोणावळ्याहून धावणारी लोकल थेट दौंडपर्यंत जाऊ शकेल.

लोणावळ्याहून विद्युतीकरणाने पुण्यापर्यंत येणारी लोकल डिझेलवर पुढे जाऊ शकते; परंतु त्याचा खर्च अधिक असल्यामुळे ती धावत नाही. मात्र, काम पूर्ण झाल्यावर ती पुढे जाऊ शकेल. रोज धावणाऱ्या रेल्वे गाड्यांनाही या कामाचा फायदा होईल. या गाड्या पुण्यापासून पुढे धावताना डिझेलवर जातात. त्याऐवजी त्या विजेवर धावू शकतील. यामुळे इंधनखर्चात बचत होणार असून, प्रदूषणही कमी होऊ शकेल. पुणे स्थानकावरून दररोज 150 रेल्वे गाड्यांची वाहतूक होते. पुणे-लोणावळा मार्गावरील लोकलच्याही 44 फेऱ्या होतात.

नियोजनानुसार पुणे-दौंड विद्युतीकरणाचे काम सप्टेबर 2014 मध्ये पूर्ण होणार आहे; परंतु या कामाचा वेग असाच कायम राहिल्यास तत्पूर्वीच ते पूर्ण होऊ शकते, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी वाय. के. सिंह यांनी स्पष्ट केले.

वाहतुकीचा ताण कमी होईल
पुणे-लोणावळा मार्गावर धावणारी लोकल दौंडपर्यंत गेल्यास पुणे- सोलापूर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. दौंडला रेल्वेने जाण्यासाठी सध्या प्रवाशांना सोसावे लागणारे हालही कमी होतील; तसेच दौंड दरम्यानच्या गावांची पुणे शहराची सलगता वाढणार आहे.