Indian Railways News => Topic started by ConfirmTicket on Jul 21, 2013 - 03:00:49 AM


Title - मनमाड- इंदूर रेल्वेमार्गासाठी मुख्यमंत्री लक्ष घालणार
Posted by : ConfirmTicket on Jul 21, 2013 - 03:00:49 AM

मालेगाव- आगामी लोकसभा निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसला विजय संपादन करावयाचा असेल, तर मनमाड- मालेगाव- धुळे- इंदूर रेल्वेमार्गाचे काम तातडीने सुरू करण्याची कॉंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी मागणी केली असता त्याकडे जातीने लक्ष घालण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. माजी आमदार रशीद शेख यांनी ही माहिती दिली.

धुळे लोकसभा मतदारसंघातील प्रमुख नेत्यांची बैठक काल रात्री आठच्या सुमारास मुख्यमंत्री चव्हाण यांच्या वर्षा या निवासस्थानी झाली. या वेळी त्यांनी मालेगाव शहरातील विविध विकासकामांसाठी पाच कोटी रुपये विशेष निधी मंजूर केला. या वेळी शहरातील दोन उड्डाणपुलांची आवश्‍यकता त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या दोन पुलांसाठी 80 कोटी निधीची आवश्‍यकता असल्याचे शेख यांनी सांगितले. त्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. नगरोत्थान योजनेतून यासाठी निधी मिळावा असा ठराव महासभेने केला आहे. केंद्र, राज्य व महापालिका निधीतून हे पूल होणे गरजेचे आहे. शहरातील घरकुले, सामान्य रुग्णालयातील रिक्त पदे याबाबत त्यांना कल्पना देण्यात आली. मुख्यत्र्यांनी घरकुल उद्‌घाटनासाठी येण्याचे मान्य केले आहे. श्री. चव्हाण यांनी गेल्या अधिवेशनात 15 कोटी, तर या वेळी नऊ कोटी रुपये विशेष अनुदान मंजूर केल्याबद्दल श्री. शेख यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, संपर्कमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सुरेश शेट्टी, माजी आमदार शेख, आमदार सुधीर तांबे, आमदार अमरिश पटेल, माजी मंत्री रोहिदास पाटील, विजय नवल पाटील, महापौर ताहेरा शेख, माजी महापौर आसिफ शेख, प्रदेश सदस्य डॉ. तुषार शेवाळे, माजी आमदार मोठाभाऊ भामरे, शरद आहेर, श्‍याम सनेर आदी उपस्थित होते.