Indian Railways News => Topic started by nikhilndls on Jul 13, 2013 - 06:00:41 AM


Title - महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांवर कारवाई
Posted by : nikhilndls on Jul 13, 2013 - 06:00:41 AM

मुंबई- अपंग आणि महिलांच्या डब्यातून विनातिकीट प्रवास करणे पोलिसांना भोवणार आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) अशा पोलिसांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईअंतर्गत मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकात अपंगांच्या डब्यातून प्रवास करणारे चार पोलिस आणि आठ प्रवासी अशा 12 जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईसंबंधीची माहिती संबंधित पोलिसांच्या वरिष्ठांनाही कळविली जाणार आहे.

मध्य आणि पश्‍चिम रेल्वेवरील उपनगरी गाड्यांतील अपंग आणि महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यातून पोलिस विनातिकीट प्रवास करीत असल्याचे प्रकार वारंवार घडतात. अनेकदा गर्दीच्या वेळी आराम करण्यासाठी हे पोलिस प्रवास करीत असल्याचे पुढे आल्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या महानिरीक्षकांनी अशा पोलिस; तसेच सर्वसामान्य प्रवाशांवरही कारवाई करण्याचे आदेश दिले. रेल्वे सुरक्षा दलाने एक विशेष अभियान कालपासून (ता. 3) सुरू केले. या अभियानांतर्गत महिला आणि अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या 12 जणांना मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकात सायंकाळी 5 ते रात्री 8 च्या दरम्यान पकडण्यात आले.

आरपीएफ, रेल्वे पोलिस, गृहरक्षक दल, तसेच एनजीओमधील 10 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे भरारी पथक यांच्याकडून अशा प्रकारची कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी रात्री झालेल्या या तपासणीत सापडलेल्या चार पोलिसांवर दंडात्मक कारवाईसोबतच त्यांच्याकडून अशा प्रकारे विनातिकीट प्रवास पुन्हा करणार नसल्याचे लिहून घेण्यात आले. एवढ्यावरच न थांबता, हे पोलिस ज्या आस्थापनांत नेमणुकीला आहेत, तेथील वरिष्ठांना त्यांच्यासंबंधी खातेअंतर्गत चौकशीची शिफारस करणारा अहवालही पाठविला जाणार असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.