Indian Railways News => Topic started by railgenie on May 19, 2013 - 21:00:04 PM


Title - मालवाहतुकीतून १४२ कोटींचे उत्पन्न
Posted by : railgenie on May 19, 2013 - 21:00:04 PM

गेल्या वर्षीच्या तुलनेत ४२ कोटींची वाढ

म . टा . प्रतिनिधी , नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वे स्टेशनला मालवाहतुकीच्या माध्यमातून सन २०१२ - १३ या आर्थिक वर्षात १४२ कोटी आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे . गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा ४२ कोटींनी वाढला असून दिवसेंदिवस स्टेशनवरून मालवाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे .

स्थानकावर प्रामुख्याने द्राक्ष , डाळींब , कांदा इत्यादी शेतीमालासोबत औद्योगिक उत्पादनांचीदेखील ने - आण होते . या माध्यमातून रेल्वेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते . प्रवासी वाहतुकीद्वारे होणारा तोटा पार्सल व मालवाहतुकीच्या माध्यमातून भरून काढला जातो . नाशिकरोड स्थानकावर २०१० - ११ या आर्थिक वर्षात २५ लाख ३० हजार ९० क्विंटल मालाची वाहतूक करण्यात आली . त्या माध्यमातून रेल्वेला ९९ कोटी २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले . २०११ - १२ या आर्थिक वर्षात २९ लाख नऊ हजार ६०० क्विंटलची वाहतूक करण्यात आली . त्या माध्यमातून रेल्वेला १०१ कोटी ४५ लाख नऊ हजार रुपये उत्पन्न मिळाले . तर २०१२ - १३ या आर्थिक वर्षात १४२ कोटी आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले . मालाची बुकिंग केल्यानंतर ठरलेल्या वेळेत माल पोहोचवण्याचे कसब रेल्वेकडे असल्याने अनेक प्रकारच्या नाशवंत मालाची वाहतूक रेल्वे मार्गानेच होते .

आधुनिक वाघिणींची कमाल

भारतीय रेल्वेचा ७० टक्के महसूल आणि बहुतांश नफा मालवाहतुकीतून होतो आणि यातूनच ‍ तोट्यात चालणाऱ्या प्रवासी वाहतुकीला अनुदानित आर्थिक साहाय्य दिले जाते . परंतु गेल्या काही वर्षांपासून , रेल्वेच्या तुलनेत ट्रकने स्वस्त दरात होणाऱ्या मालवाहतुकीमुळे रेल्वेच्या मालवाहतूक उद्योगाला स्पर्धा जाणवू लागली होती . म्हणून १९९० पासून , मध्यम क्षमतेच्या वाघिणी हळूहळू बाद करून मोठ्या आणि आधुनिक वाघिणींच्या उपयोगावर भर द्यायला सुरुवात केली आहे . या नवीन वाघिणी ‍ चा उपयोग मुख्यत्वे कोळसा , सिमेंट , धान्ये , खनिजे यांसारखा ठोक माल वाहून नेण्यासाठी केला जातो . या व्यतिरिक्त , वाहनांचीदेखील वाहतूक भारतीय रेल्वेवर केली जाते . अशा मालगाड्यांवर मालवाहू ट्रक चढवून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर पोहोचवले जातात . तिथून पुढे मालाच्या वाहतुकीचा शेवटचा टप्पा त्याच ट्रकने होतो . मालवाहू ट्रक चढवण्या - उतरवण्यासाठी सुरुवातीच्या व शेवटच्या स्थानकावर खास प्लॅटफॉर्म बांधण्यात आले आहेत . अशा प्रकारच्या मिश्रवहन पद्धतीने इंधनाची बचत होते . शिवाय माल एका वाहनातून दुसऱ्यात चढवावा उतरावा लागत नाही म्हणून मनुष्यबळ व पैसा यांची बचत व या सगळ्यामुळे वेळेची बचत मोठ्या प्रमाणावर होते . नाशवंत माल वाहतुकीमध्ये याचा सर्वांत जास्त फायदा होतो . नाशवंत माल वाहून नेण्यासाठी वातानुकूलित वाघिणी वापरल्या जातात . ग्रीन व्हॅन प्रकारच्या वाघिणी ताजी फळे व भाज्यांसाठी वापरल्या जातात . आता अतिमहत्त्वाचा माल पोहोचवण्यासाठी भारतीय रेल्वेवर कंटेनर राजधानी अर्थात कॉनराज गाड्याही आहेत .