Indian Railways News => Topic started by puneetmafia on May 18, 2013 - 03:00:10 AM


Title - मेगाब्लॉकच्या दिवशी ठाणेमार्गे पनवेल
Posted by : puneetmafia on May 18, 2013 - 03:00:10 AM

मेगाब्लॉक असेल त्या वेळेत हार्बरच्या नवी मुंबईकरांना सीएसटीहून वाशी वा पनवेलला जाण्यासाठी ठाणेमार्गे ट्रान्सहार्बर लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला असून त्याची अंमलबजावणी दोन आठवड्यांत होऊ शकेल . या सुविधेमुळे नवी मुंबईतील लाखो प्रवाशांना मेगाब्लॉकवेळी रखडावे लागणार नाही .

उपनगरीय मार्गाच्या देखभालीसाठी दर रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो . मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वाहतूक या वेळेत विलंबाने का होईना सुरू असते . पण , हार्बर मार्गावर सीएसटी ते पनवेलपर्यंतचा मार्ग पूर्णपणे बंद ठेवला जातो . परिणामी , नवी मुंबईतील प्रवाशांना बससाठी ताटकळत उभे राहावे लागते . हे हाल लक्षात घेऊन मध्य रेल्वेने हार्बरच्या प्रवाशांसाठी ट्रान्सहार्बर मार्ग वापरण्याचे ठरवले आहे . त्यानुसार , ' मरे ' ने मुख्य मार्गावरून ठाण्यापर्यंत आणि तिथून ट्रान्सहार्बर मार्गाने वाशी - पनवेलपर्यंत लोकल जोडण्याचा पर्यायी मार्ग अवलंबण्याचे ठरवले आहे . ठाणे यार्डच्या रिमॉडेलिंगचे मोठे काम पूर्ण झाल्याने हा पर्यायी मार्ग खुला झाल्याचे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले .

चारपैकी दोन ट्रॅक उपलब्ध

पनवेलला जोडणाऱ्या चार ट्रॅकपैकी प्रत्येकी दोन - दोन ट्रॅक ठाणे ते पनवेल आणि सीएसटी ते कुर्ला - मानखुर्दमार्गे जातात . त्यामुळे मानखुर्द - वाशीवर मेगाब्लॉक असल्यास पनवेल लोकल ठाण्यावरून पुढे नेण्यात येतील . येत्या आठवड्यात वा त्यापुढच्या आठवड्यात मेगाब्लॉक घेतला जाईल , तेव्हा ही पर्यायी पद्धत अवलंबली जाईल . मात्र , त्याच्या फेऱ्या कमी असतील , असेही स्पष्ट करण्यात आले आहे .