Indian Railways News => Topic started by railenquiry on Jul 10, 2013 - 12:00:03 PM


Title - रेल्वे पार्कींगचा तिढा सुटेना
Posted by : railenquiry on Jul 10, 2013 - 12:00:03 PM

नाशिकरोड

रेल्वे स्टेशन परिसरात येणा-या प्रवाशांना आपली वाहने लावण्यास जागा नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या अस्तित्वात असलेले देवी चौकातील पार्कींग अपुरे पडत असल्याने. प्रवासी आपली वाहने रस्त्यावर उभी करीत आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून रेल्वे प्रशासनाने पार्कींगची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या नागरिकांना वाहने कुठे लावावीत असा प्रश्न सतावतोय. रेल्वे आरक्षण केंद्राबाहेरचे पार्कींग प्रशासनाने हालविल्यानंतर देवी चौकात वाहने लावण्याची सोय केली. परंतु हे पार्कींग रेल्वे स्टेशनपासून दूर असल्याने प्रवासी जुन्या पार्कींगच्या ठिकाणी म्हणजेच रेल्वेस्टेशनसमोर , देवी चौक ते आंबेकर पुतळा मार्ग व रेल्वे मेल सर्विसच्या कार्यालयाजवळ गाड्या पार्क करीत आहेत. रेल्वे स्टेशन समोरील जागा फुल्ल झाल्यानंतर तेथेही जागा न मिळाल्यास काही प्रवाशी खाजगी सोसायट्यांमध्ये बिनधास्त गाड्या पार्क करीत असल्याने या भागातील रहीवाशीही पार्कींगमुळे त्रस्त झाले आहे. सध्याचे देवी चौकातले पार्कींग सकाळी पंचवटी एक्सप्रेस येण्याच्या वेळेलाच फुल्ल होऊन जाते. त्यानंतर येणाऱ्या प्रवाशांना गाड्या लावण्यासाठी जागा मिळत नाही. प्रवाशांना सेवा देणे तर दुरच परंतु त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्याचे स्वारस्य प्रशासन दाखवीत नाही. प्रशासन फक्त पार्कींगचे टेंडर काढते परंतु ती जागा पार्कींगसाठी योग्य आहे किंवा नाही याचा अभ्यास करीत नाही.

स्टेशनबाहेर वाहने लावल्यास पोलिस वाहने उचलून नेतात. यामुळे नागरिकांना दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागते आहे. स्टेशनच्या बाहेर रिक्षावाल्यांनी जागा अडकविल्याने प्रवाशांना वाहने स्टेशनच्या परिसरात नेणेही अवघड बनते. रेल्वे प्रशासनाने आणखी पार्कींगची सोय उपलब्ध करुन द्यावी अशा मागणी नागरिकांनी केली आहे. पार्कींगबाबत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पोलिसांचेही दुर्लक्ष

जुन्या पार्कींगच्या ठिकाणी वाहने लावू नये यासाठी दोन पोलिसांची नेमणूक केली आहे. परंतु पोलिस आपल्या कर्तव्याकडे न लक्ष देता दुसरेच ' कर्तव्य ' पार पाडतात. वाहन धारकाला नो पार्कींगच्या ठिकाणी वाहने लावू देतात व रेल्वेस्टेशनवरून परतल्यावर त्याच्यावर कारवार्ई करण्याचा दम देत आपला ' कार्यभाग ' साधत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली.