Indian Railways News => Topic started by messanger on Jul 09, 2013 - 09:02:01 AM


Title - रेल्वे रिझर्वेशनचा अनागोंदी कारभार
Posted by : messanger on Jul 09, 2013 - 09:02:01 AM

नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील रेल्वे रिझर्वेशन काऊंटरवर तिकीट रिझर्वेशनसाठी आलेल्या प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून तिकीट बुकींगमध्ये गैरव्यवहार होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे . प्रवाशांना हिन दर्जाची वागणूक मिळत असल्याचेही प्रवाशांचे म्हणणे आहे .

नाशिकरोड रेल्वे स्थानकावर तिकीट रिझर्वेशनसाठी रांगेत उभे राहिल्यानंतर तिकीट मिळत नाही . तात्काळ तिकीटासाठी नंबर लावल्यानंतर पहिल्या दोन प्रवाशानंतर तिकीट बंद झाल्याची घोषणा केली जाते . परंतु एजंटमार्फेत रिझर्वेशन काढल्यास तुम्हाला नंबर न लावताही घरपोहच तिकीट मिळत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे . येथील कर्मचारी रिझर्वेशनसाठी आलेल्या प्रवाशांना व्यवस्थित उत्तरे देत नाहीत . रिझर्वेशनचा फॉर्म भरुन दिल्यानंतर तिकीटावर वेगळीच माहिती छापून येते . याबाबत कर्मचाऱ्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात . प्रवाशांकडून फॉर्म भरण्यास चूक झाल्यास त्याला पुन्हा फॉर्म भरुन पुन्हा नंबर लावण्यास सांगण्यात येतो . येथे रेल्वे कर्मचाऱ्यां व्यतिरिक्त एजंट उभे असतात . त्यांना जास्त पैसे दिल्यास आत जाऊन पाहिजे तेवढी तिकीटे काढून देतात . प्रवाशांनी ठराविक गाडी संबंधी माहिती विचारल्यास आम्हाला सांगता येणार नाही तिकीट काढायचे असल्यास काढा अन्यथा निघून जा असे सांगण्यात येते . काही कर्मचारी पान गुटखा खाऊन रिझर्वेशन काढण्यासाठी बसतात . त्यामुळे ते काय बोलतात हे प्रवाशांना समजत नाही . रेल्वे स्टेशनच्या आवारात गुटखा खाण्यास सिगरेट पिण्यास बंदी असताना कर्मचाऱ्यांना तो नियम लागु नाही का ? असा सवाल प्रवाशी विचारत आहेत .

तिकीट काढल्यानंतर हिशेबात नेहमी घोळ होतो . अनेक प्रवाशांना पैसे परत मिळतांना कमी मिळत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे . पैसे कमी का दिले अशी विचारणा केल्यास तुम्ही सुटे दोन रुपये आणून द्या त्यानंतर दहा रुपये घेऊन जा अशी अनेक प्रवाशांची अडवणूक केली जाते . या जाचाला कंटाळून अनेक प्रवासी पाच ते दहा रुपये सोडून देतात . रेल्वे रिझर्वेशन काऊंटर संबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले असता बघतो , कारवाई करतो अशी उत्तरे दिली जातात . तरीही यांच्यावर लवकर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे .