Indian Railways News => Topic started by railgenie on Jul 12, 2013 - 09:01:07 AM


Title - रेल्वेचे नव्हे हे तर समस्यांचे स्टेशन
Posted by : railgenie on Jul 12, 2013 - 09:01:07 AM

वाशिम : पूर्णा-अकोला रेल्वेमार्गावरील सर्वाधिक उत्पन्न देणारे वाशिम रेल्वे स्थानक केवळ विविध समस्यांचे स्टेशन झाले आहे. परिणामी, प्रवासी पार वैतागून गेले आहेत. रेल्वे प्रशासन मात्र अद्यापही सुस्तच आहे.
गतवर्षी या स्थानकाने रेल्वे विभागाला सुमारे ३२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले. त्यानंतरही रेल्वे विभागाने येथे कुठल्याच सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. येथे गुड्स ट्रान्सपोर्टसाठी शेड उभारलेले नाही. व्यापार्‍यांचा लाखमोलाचा माल बेवारस पडून असतो. गुड्स प्लॅटफार्मच्या दोन्ही बाजूंना गेट व तार फेन्सिंग केलेले नाही. या शिवाय येथे अस्वच्छतेने कळस गाठला आहे. स्थानकावर चालू बुकिंग व आरक्षणाची स्वतंत्र व्यवस्था नाही. तीन अथवा चार चाकी गाड्यांना स्टेशनबाहेर रोखण्यासाठी बॅरिकेट्स उभारण्यात आलेले नाहीत. कुलींची नियुक्ती केली नाही. पावसाळ्याच्या दिवसांत फलांटावर पाणी साचते. या समस्यांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. याबाबत रेल्वे विकास समितीने नांदेड येथील दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे पाठपुरावा केला आहे. तथापि, त्याची अद्यापपावेतो दखल घेतली गेली नाही.