Indian Railways News => Topic started by nikhilndls on Jul 11, 2013 - 21:00:03 PM


Title - रेल्वेस्थानकावर मोबाईल पार्सल जप्त
Posted by : nikhilndls on Jul 11, 2013 - 21:00:03 PM

नागपूर - मोबाईलचे पार्सल घेऊन जाणाऱ्या एका संशयितास रेल्वे सुरक्षा दलाने मंगळवारी (ता. नऊ) रात्रीच्या सुमारास रेल्वेस्थानकावर ताब्यात घेतले. संशयिताकडून रेल्वे पोलिसांनी मोबाईल पार्सल जप्त केले असून, त्यास न्यायालयापुढे सादर करण्यात आले. पाचशे रुपये दंडासोबतच आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश न्यायालयाने संबंधितास दिले.

रेल्वे सुरक्षा दलाचे जवान मंगळवारी रात्री रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक चारवर गस्त घालत होते. रात्री दहाच्या सुमारास त्यांना मुंबई एंडच्या दिशेने सीताराम गोपालचंद रॉय (वय 57, रा. बजेरिया, भोपाळ) हे संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आला. रेल्वे सुरक्षा जवान वासनिक, गजभिये आणि थापा यांनी त्याची चौकशी केली असता, पार्सलविषयी त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. थोड्याच वेळात मी मोबाईलचे पार्सल घेऊन भोपाळला जात असल्याचे त्याने रेल्वे सुरक्षा दलास सांगितले. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यास तिकीट मागितले. शिवाय पार्सलमधील माल खरेदीचे कागदपत्रे दाखविण्यास सांगितले. मात्र, त्याच्याकडे रेल्वेचे तिकीट किंवा पार्सलमधील मालाचे विवरण असलेली कागदपत्रे आढळली नाहीत. त्यामुळे आरोपी सीताराम रॉय यास रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी ताब्यात घेऊन इंटेक्‍स कंपनीचे दोनशे मोबाईल असलेला माल जप्त केला. यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने रात्रीच्या सुमारास लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधून प्रकरण त्यांच्याकडे स्थानांतरित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तपासाच्या कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याने हे प्रकरण तपासासाठी घेण्यास लोहमार्ग पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे शेवटी रेल्वे सुरक्षा दलास संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे ठरले. या प्रकरणातील आरोपी राय यास बुधवारी रेल्वे सुरक्षा दलाने न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने पाचशे रुपये दंड आणि मोबाईल पार्सलचे पूर्ण कागदपत्रे सादर करण्याच्या आदेश देऊन आरोपीचा जामीन मंजूर केला.