Indian Railways News => Topic started by railgenie on Jul 10, 2013 - 00:00:04 AM


Title - विरार, असुविधांचा प्लॅटफॉर्म-
Posted by : railgenie on Jul 10, 2013 - 00:00:04 AM

विरार रेल्वे स्टेशनातील प्लॅटफॉर्म क्रमांक आठची लांबी वाढविण्याचे काम रखडल्याने सर्वसामान्य प्रवाशांना मोठा त्रास होत असून डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. तर नव्या पादचारी पुलाच्या कामाचे फाउंडेशन झाले असून हे कामही डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल, असा दावा केला जातोय. रेल्वे स्टेशनात भिकारी, निराश्रितांचे आक्रमण झाले असून त्यांच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच सबवे फेरीवाल्यांना आंदण दिला असून याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.

विरार रेल्वे स्टेशनात अनेक समस्यांचे जंजाळ आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक आठ हा मुख्य फलाटांपासून दूर असून १५ डब्यांच्या गाड्या थांबवता याव्यात म्हणून आठ नंबरची लांबी वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले. एक-दीड वर्षांपूर्वी हे काम सुरू झाले व त्यानंतर रखडले. आठ नंबरची लांबी वाढविण्यासाठी शेडचे पत्रे काढण्यात आले, खड्डे खणण्यात आले असून आता पावसात प्रवाशांना आठ नंबरवरून पुढे चालत जाताना त्रास होतो. रात्रीच्या अंधरात प्रवासी या खड्ड्यात पडल्याच्या घटना घडल्या आहेत. आठ नंबरच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढविल्यानंतर येथे नवे टॉयलेट केले जाणार आहे. डिसेंबरपर्यंत नक्कीच हे काम पूर्ण होईल असे स्टेशन मॅनेजरनी सांगितले. सध्या एकमेव धोकादायक पादचारी पुलावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. रेल्वेने पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या एका नव्या पादचारी पुलाचे काम सुरू केले आहे. चार-पाच नंबरच्या प्लॅटफॉर्मवर पादचारी पुलाचे फाउंडेशन झाले असून ब्रिजचे सामान येऊन पडले आहे. सध्या येथे ब्रिज नसल्याने दररोज हजारो प्रवासी रेल्वे क्रॉसिंग करतात. या नव्या पादचारी पुलाचे कामही जोरदार सुरू असल्याचे रेल्वे कर्मचारी म्हणाले. प्रवाशांच्या जिव्हाळ्याची ही कामे याच वर्षात पूर्ण व्हायला हवीत, असे विरार पश्चिमेकडील ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत म्हात्रे यांनी सांगितले. स्टेशनात असलेल्या पाणपोई नावाला असून कुलरही सर्व फलाटांवर लागलेले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

भिकाऱ्यांचे आक्रमण

रेल्वे स्टेशनात सर्वच प्लॅटफॉर्मवर भिकारी, निराश्रित, बेघरांचे आक्रमण झाले असून त्यामुळे सर्वत्र घाण असते. या बेगरांवर तसेच सबवेत बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईची जबाबदारी जीआरपी, आरपीएफ यांची आहे. भिकाऱ्यांवर 'कारवाई' केली जाते, असा दावा अधिकारी करत असले तरी प्रत्यक्षात अशी कारवाई कधीच दिसलेली नाही. कुणीही यावे रेल्वे स्टेशनात राहून जावे, अशी स्थिती झाल्याने रेल्वे स्टेशनला अजिबात सौंदर्य उरलेले नाही. दुपारच्या वेळेस स्टेशनात झोपण्यासाठी अनेक भिकारी येतात. रात्रीही अशीच परिस्थिती असते. रेल्वे स्टेशनातील सबवेमध्ये पूणपणे फेरीवाले, विक्रेते बसलेले असतात. सर्व प्रकारच्या वस्तू येथे मिळत असून मिनी मॉल रोज भरलेले असतो. रेल्वेचे अधिकारी येतात त्यावेळेस सबवे व रेल्वेच्या परिसरातील फेरीवाले गायब होतात. मात्र एरव्ही या फेरीवाल्यांवर अजिबात कारवाई होत नाही. ज्यांनी कारवाई करायची ते आपला हिस्सा घेऊन गुपचूप निघून जातात. मात्र यामुळे होणार्या गर्दीमुळे गैरप्रकारही होण्याची भीती आहे.

स्टेशनातील पाच नंबरच्या रेल्वे रूळांवर नेहमी घाण असूनही ती स्वच्छ होत नाही. एक ते तीन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर टॉयलेट असून त्याचाही प्रवाशांव्यतिरिक्त बाहेरचे लोक अधिक वापर करतात. प्रवाशांसाठी डीलक्स टॉयलेटचे काम आतापर्यंत मार्गी लागलेले नाही. यामुळे सर्वसामान्य प्रवासी संताप व्यक्तआहेत.