Indian Railways News => Topic started by puneetmafia on May 09, 2013 - 21:00:35 PM


Title - संतप्त व्यापाऱ्यांचा रेलरोको
Posted by : puneetmafia on May 09, 2013 - 21:00:35 PM

नागपूर - स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात व्यापारी आक्रमक झाले असून, बुधवारी (ता. 8) मोतीबाग रेल्वेस्थानकावर रेल्वेरोकोचा प्रयत्न फसल्यानंतर मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर जाऊन आंदोलक व्यापाऱ्यांनी सलग दोन रेल्वे गाड्यांना रोखून खळबळ उडविली. या प्रकरणी दोन व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली असून, चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एलबीटी रद्द झाल्याशिवाय माघार नाही, अशी ठाम भूमिका व्यापारी आणि शासनाने घेतल्याने आंदोलन चिघळू लागले आहे.

एलबीटीविरोधात उपराजधानीतील व्यापाऱ्यांनी सलग 17 दिवसांपासून बेमुदत बंद पुकारला आहे. यामुळे शहरातील व्यवसाय ठप्प झाला असून, सर्वसाधारण ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे. मंगळवारी दुकाने उघडून व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांचा धिक्कार करण्यासाठी तृतीयपंथीची रॅली काढली होती. बुधवारी मात्र, आक्रमक भूमिका घेत व्यापाऱ्यांनी दुपारपासून रेल्वेरोको करण्यास सुरुवात केली. दुपारी डोबीनगर, मोतीबाग येथील रेल्वेलाइनवर व्यापाऱ्यांनी अचानक धावा करून हावडा येथून आलेल्या लोकमान्य टिळक एक्‍स्प्रेसला थांबविण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्यांनी रेल्वे थांबल्यानंतर प्रदर्शनही केले. मात्र, या स्थानकावर रेल्वे थांबत असल्याने त्यांचा रेल्वेरोकोचा डाव फसला. त्यानंतर मात्र, दुपारी दीडच्या सुमारास सुरक्षा यंत्रणेला बगल देत मध्यवर्ती रेल्वेस्थानकावरील "डी कॅबिन' जवळ तीनशे ते चारशे व्यापारी रेल्वे रुळावर उतरले. दरम्यान, त्यांनी दुपारी दीडच्या सुमारास शालीमार एक्‍स्प्रेस आणि रामेश्‍वर शहाडोल यात्रा स्पेशल रेल्वे रोखून धरल्या. यामुळे दोन्ही रेल्वे गाड्या पाच मिनिटे उशिरा रवाना झाल्या. या घटनेमुळे रेल्वेस्थानक परिसर आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांमध्ये खळबळ उडाली होती.

या प्रकरणी मोहम्मद इमरान वल्द ईमरान शरीफ, महमंद आसिफ महमद आसीफ वल्द महमंद इब्राहिम या दोघांना रेल्वे अधिनियम 174 अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तर, मधुसूदन अग्रवाल, राजू माखीजा, खोपचंद आहुजा आणि अमजद अली यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वे विभागाच्या सुरक्षा यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. रात्री आठच्या दरम्यान, नागपूर-नागभीड पॅसेंजर रेल्वे हिवरीनगरजवळ थांबविल्याची माहिती होती. दरम्यान, संप्तत व्यापाऱ्यांनी दिल्ली-हावडा मार्गावरही रेल्वेरोको करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी व्यापाऱ्यांना रेल्वे रुळावरून हुसकावून लावले.

व्यापाऱ्यांनी शहरातील दुकाने बंद करण्यासाठी बुधवारीही ठिकठिकाणी रॅली काढून धरणे आंदोलन केले. शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. पाचपावली व्यापाऱ्यांनी शासनाला सद्‌बुद्धी देण्यासाठी महायज्ञ केला. एलबीटीच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय पाटील यांनी पत्रपरिषद घेतली. व्यापाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी असल्याचे स्पष्ट केले.