Indian Railways News => Topic started by riteshexpert on May 10, 2013 - 09:00:32 AM


Title - सांताक्रूझ स्टेशन...समस्यांचे आगर - मुंबई
Posted by : riteshexpert on May 10, 2013 - 09:00:32 AM

हार्बर आणि पश्चिम मार्गावरील प्रवाशांना जोडणारे महत्त्वाचे स्टेशन म्हणजे सांताक्रूझ. पूर्वीची संपूर्णतः शान गमावून बसलेल्या या स्टेशनला पश्चिम रेल्वे प्रशासनामुळे अवकळा आली आहे. तिकीट खिडक्यांवरील अतोनात गर्दी , तुडुंब भरलेले पूल , स्वच्छतागृहांची कमतरता अशा समस्यांच्या विळख्यात सांताक्रूझ स्टेशन अडकले आहे.

पाच आणि सहा क्रमांक प्लॅटफॉर्म हार्बरसाठी आहेत. एक आणि दोन क्रमांकाचे प्लॅटफॉर्म बोरीवली-चर्चगेट या स्लो मार्गांसाठी आहेत. तर , तीन आणि चार क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरून विरार-चर्चगेट फास्ट लोकल धावतात. प्रत्यक्ष सांताक्रूझमध्ये चार प्लॅटफॉर्मचा वापर होतो. पश्चिम रेल्वेपेक्षा हार्बरवरील गर्दी तुलनेने कमी असते. त्यामुळेच सारा भार एक आणि दोन क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर पडतो. तीन आणि चार नंबरच्या प्लॅटफॉर्मवर लोकल थांबत नसल्याने त्यावर प्रवासी नसतात.

' परे ' आणि हार्बरच्या प्रवाशांसाठी दुवा ठरणाऱ्या या स्टेशनकडे दुर्लक्ष केले जात आहे. गर्दी वाढली तरी तिथल्या सुविधांमध्ये वाढ झालेली नाही. हार्बरचे प्लॅटफॉर्म ' परे ' च्या प्लॅटफॉर्मपासून लांब आहेत. त्याउलट विलेपार्ले , खार , माहीम येथील हार्बरचे प्लॅटफॉर्म एकमेकांना जोडूनच आहेत. त्यामुळे दोन्ही मार्गावरील प्रवाशांना ये-जा करणे सोपे असते. पण , सांताक्रूझमध्ये मात्र त्यासाठी प्रवाशांना लांबचा फेरा मारावा लागतो.

या स्टेशनच्या तिकीट खिडक्यांवरही गर्दी आढळते. मधल्या पुलावर तिकीट खिडकीवर कमी जागा असल्याने गर्दी असते. स्टेशनला जोडून असणाऱ्या खिडक्यांवरही तीच स्थिती आहे. दोन्ही मार्गांचे प्रवासी असल्याने तिकीट खिडक्यांवर गर्दी वाढते. त्यातच काही खिडक्या बंदही असतात. ' एटीव्हीएम ' आणि ' सीव्हीएम ' बिघडलेले असल्याने गर्दी वाढतच राहते.

या स्टेशनवर तीन पूल आहेत. पूर्व आणि पश्चिमेस जोडणारे हे पूल अत्यंत अरुंद आहेत. बोरीवली आणि चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या लोकल एकाचवेळी आल्यास पुलावरील गर्दीमुळे प्रवासी अडकून पडतात. परेच्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर नेहमीच गर्दी असल्याने प्रवाशांना बसण्यासाठी फारशी जागा मिळत नाही. त्याउलट , हार्बरच्या प्लॅटफॉर्मवर दुपारच्या वेळी शुकशुकाट असतो.

प्लॅटफॉर्म दोनवरील पाणपोयीची अवस्था वाईट आहे. त्याठिकाणी पाण्यासाठी भिकाऱ्यांची गर्दी असल्याने प्रवासी अजिबात फिरकताना दिसत नाहीत. स्वच्छतागृहांचेही तेच चित्र आहे. दोन क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर चर्चगेटच्या दिशेने एक स्वच्छतागृह आहे. हे देखील प्लॅटफॉर्मपासून दूर असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. या ठिकाणी अस्वच्छता , दुर्गंधी पसरली असून ही स्थिती बदललेली नसल्याची प्रवाशांची व्यथा आहे.

शेड्सची स्थिती चांगली असून सर्वच प्लॅटफॉर्मवर शेड्स आहेत. पंख्यांची व्यवस्थाही चांगली आहे. मात्र , ' परे ' च्या प्लॅटफॉर्मवर वावरण्यासाठी फारशी जागा नाही. वैद्यकीय सुविधाही फार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नाहीत. त्यामुळे आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास वैद्यकीय मदत पुरवण्यात अडचण येऊ शकते.