Indian Railways News => Topic started by RailXpert on Jun 10, 2013 - 06:02:19 AM


Title - सीएसटी-पनवेल प्रवास व्हाया ठाणे
Posted by : RailXpert on Jun 10, 2013 - 06:02:19 AM

मुंबई - रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी उद्या (ता.9) मध्य रेल्वेचा माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावर कुर्ला-मानखुर्द स्थानकांदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3.15 या वेळेत मेगा ब्लॉक आहे. त्यामुळे रविवारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित राहील.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा-मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल. त्यामुळे सकाळी 9.37 पासून दुपारी 2.51 वाजेपर्यंत जलद लोकल आणि मेल, एक्‍सप्रेस गाड्या माटुंगा-मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावरून चालविल्या जातील. उपनगरी जलद लोकल माटुंगा-मुलुंड स्थानकांदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. मुलुंडपासून पुढे त्या जलद मार्गावर धावतील. वाहतुकीतील या बदलामुळे अप आणि डाऊन जलद लोकल प्रत्येक स्थानकांत त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने दाखल होतील.

हार्बर मार्गावर कुर्ला-मानखुर्द स्थानकांदरम्यान ब्लॉक घेतला जाईल. त्यामुळे अप आणि डाऊन लोकलची वाहतूक सकाळी 10.23 ते दुपारी 3.01 वाजेपर्यंत सीएसटी-पनवेल स्थानकांदरम्यानची लोकल वाहतूक बंद राहील.

सीएसटी-पनवेल व्हाया ठाणे
सीएसटी-पनवेल हार्बर लोकलची थेट वाहतूक बंद राहणार असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी "सीएसटी-ठाणे ट्रान्सहार्बर-पनवेल' या मार्गाने लोकल चालविल्या जातील. दिवसभरात आठ लोकल सोडण्यात येणार आहेत. सीएसटी-पनवेल ही लोकल मेनलाईनवरून ठाण्याला जाईल आणि ठाणे स्थानकातून ट्रान्सहार्बर मार्गे ती पनवेलला पोचेल. मशीद बंदर, सॅन्डहर्स्ट रोड, भायखळा, दादर, कुर्ला, ठाणे या स्थानकांवर या लोकल थांबतील. ठाणे-पनवेल स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बरवरील सर्व स्थानकांवर लोकल थांबेल, असे मध्य रेल्वेच्यावतीने सांगण्यात आले.