Indian Railways News => Topic started by railgenie on Jul 13, 2013 - 06:00:48 AM


Title - सीव्हीएम कूपन्स मार्चमध्ये बंद होणार
Posted by : railgenie on Jul 13, 2013 - 06:00:48 AM

मुंबई - सीव्हीएम कूपन्सचा वापर निम्म्यावर आणण्यात मध्य रेल्वेला यश आले आहे. रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार मार्च 2014 पर्यंत सीव्हीएम कूपन्स पूर्णपणे बंद केली जातील. सीव्हीएम कूपन्सला पर्याय म्हणून मंत्रालय आणि जास्त लोकवस्तीच्या भागात एटीव्हीएम लावण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी दिली.

सीव्हीएम कूपन्स बंद करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. उपनगरी लोकलचे 3 लाखांहून अधिक प्रवासी सीएव्हीएमचा वापर करीत होते. त्यामुळे ते तातडीने बंद करणे शक्‍य नव्हते. मध्य रेल्वेने सीव्हीएमला पर्याय म्हणून एटीव्हीएमची संख्या वाढवली आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरी रेल्वेस्थानकांवर सध्या 368 एटीव्हीएम असून आणखी 288 नवीन एटीव्हीएम लावण्यात येणार आहेत. सीव्हीएमचा वापर कमी झाला असून सध्या 94 हजार प्रवासीच त्याचा वापर करीत आहेत. त्यामुळे मार्च 2014 पर्यंत ही संख्या आणखी कमी होईल आणि त्यानंतर सीव्हीएम बंद करण्यात येतील.

नागरी भागातही एटीव्हीएम
रेल्वे स्थानकांप्रमाणे जास्त लोकवस्तीच्या भागातही एटीव्हीएम मशिन्स बसविण्यात येणार आहेत. ठाण्यातील वर्तक नगर भागात एक एटीव्हीएम मशीन लावण्यात आले आहे. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसाठी मंत्रालयाच्या आवारात लवकरच एक एटीव्हीएम लावण्यात येईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी सांगितले. लोकवस्तीच्या भागात रेल्वे तिकिटे मिळण्याची सोय उपलब्ध झाल्यास तिकीट खिडक्‍यांवरील रांगा कमी होतील. त्यामुळे प्रवाशांचा वेळ व त्रास वाचणार आहे.