Indian Railways News => Topic started by nikhilndls on Jul 11, 2013 - 12:00:54 PM


Title - हल्ल्याच्या ट्वीटमुळे मुंबईत सुरक्षेत वाढ, रेल्वे पोलिसांचीही तयारी
Posted by : nikhilndls on Jul 11, 2013 - 12:00:54 PM

टि्वटरवरून 'आयएम'च्या नावे धमकी
............
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
'पुढचा हल्ला मुंबईवर असेल', इंडियन मुजाहिदीनच्या तथाकथित ट्विटर अकाउंटवरवरील या संदेशामुळे शहरातील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. हे अकाउंट 'आयएम'चे नसल्याचे पोलिसांनी म्हणणे असले तरी बोधगया मंदिरावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही जोखीम घेतली जाणार नाही, असे सुरक्षायंत्रणांनी स्पष्ट केले.
बोधगया येथील हल्ल्यानंतर इंडियन मुजाहिदीनच्या अकाउंटवर 'नौ धमाके हमने करवाए' असा संदेश लिहिण्यात आला. हे इंडियन मुजाहिदीनचे अधिकृत अकाउंट असल्याचा दावा त्यावर करण्यात आला आहे. बिहारमधील स्फोटांच्या दोन दिवस आधी, ५ जुलै रोजी याच अकाउंटवर मुंबईसंबंधीही ट्विट करण्यात आले होते. 'हमारा अगला टारगेट मुंबई है. रोक सको तो रोक लो. सेव्हन डेज लेफ्ट', अशी धमकी त्यामध्ये देण्यात आली होती.
एटीएस तयारीत
राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने (एनआयए) या अकाउंटबद्दल तपास करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील दहशतवादविरोधी पथकाच्या प्राथमिक तपासामध्ये हे अकाउंट अधिकृत नसल्याचे समजले आहे, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मात्र, तरीही सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे. एटीएसच्या सर्व अधिकाऱ्यांना अॅलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच पोलिसांनाही यासंबंधी माहिती देण्यात आली आहे.
....
सुरक्षारक्षकही सावध
सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सदानंद दाते यांनी ट्विटरवरील संदेशाबाबत काही बोलण्यास नकार दिला. सध्याची परिस्थिती पाहता आम्ही सर्व पोलिसांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तसेच महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी पावले उचलली आहेत. महत्त्वाच्या ठिकाणच्या सुरक्षारक्षकांनाही आम्ही सावध केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
....
रेल्वे पोलिसांचीही तयारी
नाकाबंदी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रेल्वे स्टेशनचीही छाननी होत असून श्वानपथकालाही तैनात ठेवण्यात आले आहे. रेल्वेच्या डब्यांमध्येही पोलिसांनी तपासणी सुरू ठेवली असून प्रवाशांनाही सावधान राहून पोलिसांना संशयास्पद वस्तूंची माहिती देण्याबाबत उद्घोषणा करण्यात येत असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.