Indian Railways News => Topic started by nikhilndls on Aug 13, 2012 - 18:00:20 PM


Title - : येणार 5 नव्या रेल्वे गाड्या, पीटलाइनचे काम लवकरच पूर्णत्वास जाणार
Posted by : nikhilndls on Aug 13, 2012 - 18:00:20 PM

सोलापूर - मध्य रेल्वेमध्ये उत्कृष्ट सेवा आणि उत्पन्न मिळवून देण्यात तिसरा क्रमांक पटकावलेल्या सोलापूर विभागाला पाच नव्या रेल्वे गाड्या उपलब्ध होत आहेत. स्थानकावरील पीटलाइनचे काम अंतिम टप्प्यात आल्यामुळे ही शक्यता बळावली आहे. सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्याही वाढणार आहे. पीटलाइन ऑक्टोबरपासून कार्यान्वित होईल. यामुळे सोलापूर रेल्वेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

गेल्या अडीच वर्षांपासून हे काम केवळ निधीअभावी रखडले होते. तब्बल साडे तीन कोटी रुपये खर्च करून 530 मीटर लांबीचे पीटलाइन फलाट क्रमांक पाचच्या बाजूला तयार करण्यात आले. या पीटलाइनवर रेल्वेचे एकूण 24 डबे एका वेळेस उभे राहू शकतात. सध्याच्या पीटलाइनवर केवळ 18 डबे उभारण्याचीच व्यवस्था उपलब्ध होती, अशी माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडळ व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी दिली.

पीटलाइन म्हणजे काय

साधारणपणे साडेतीन ते चार फूटांपर्यंत रेल्वे रूळांच्या मधला भाग हा कर्मचार्‍यांना उभारता यावा म्हणून खणला जातो. खणलेल्या भागात उभारून आतील कर्मचारी हा डब्यांचा खालचा भाग तपासतो. यात चाकांपासून ते वातानुकूलित डब्यांना पुरवण्यात येणार्‍या वातानुकूलित यंत्रणेचा समावेश असतो. रात्रीच्या वेळीदेखील देखभालीचे काम करता यावे म्हणून येथे सर्व प्रकारची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वे डब्यांची देखभाल आणि दुरुस्ती सहजपणे करता यावी म्हणून पीटलाइन तयार केले जाते.

सामावतील 24 डबे

नव्याने बांधण्यात येत असलेल्या पीटलाइनवर 24 डबे सामावतील. एक डबा 22 मिटरचा असतो. तर पीटलाइन ही 530 मिटरची आहे.

यासाठी पीटलाइन महत्त्वाची

सोलापूर स्थानकावरून सुटणार्‍या चार रेल्वे गाड्यांच्या देखभालीसाठी पीटलाइन महत्त्वाची ठरते. यात सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस, सोलापूर- पुणे हुतात्मा एक्स्प्रेस, सोलापूर- हुबळी एक्स्प्रेस, सोलापूर- पुणे पॅसेंजर आदी गाड्यांच्या देखभालीचे काम होणार आहे. या सर्व गाड्या सोलापूर विभागासाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जातात.

‘सिद्धेश्वर’चा मार्ग मोकळा

मुंबई गाठण्यासाठी सिद्धेश्वर एक्स्प्रेस ही सोयीची गाडी आहे. त्यामुळे सिद्धेश्वर एक्स्प्रेसला प्रवाशांची मोठी गर्दी असते. सध्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसला 19 डबे जोडण्यात आलेले आहेत. पीटलाइनमुळे सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या डब्यांच्या संख्येत वाढ होऊन ऑक्टोबर महिन्यात ती 21 वर पोहोचेल. भविष्यात सिद्धेश्वरला 24 डबे जोडण्यास सोलापूर विभाग प्रयत्नशील आहे.