Indian Railways News => Topic started by RailXpert on Aug 21, 2013 - 12:00:05 PM


Title - भुसावळपासून तोडा, नागपूरला जोडा! अमरावती, बडनेरासह सहा रेल्वेस्थानके समस्यांनी त्रस्त
Posted by : RailXpert on Aug 21, 2013 - 12:00:05 PM

अमरावती, बडनेरासह सहा रेल्वेस्थानके समस्यांनी त्रस्त

अमरावती - पादचारी पूल, उद्‌घोषणा, फूडप्लाझा, सायबर कॅफे आणि सायकल स्टॅण्ड अशा अनंत समस्या सोडविण्यात "भुसावळ झोन'ला अंतराच्या मोठ्या मर्यादा पडतात. अमरावती, बडनेरा आणि नरखेड मार्गावरील चार स्थानके तातडीने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला जोडली तर प्रशासकीय नियंत्रण आणि समन्वय सहज शक्‍य होऊन लाखो प्रवाशांची नाहक त्रासातून सुटका होईल.

भुसावळ विभाग अमरावतीपासून 229 किलोमीटर दूर आहे. त्या तुलनेत नागपूर विभाग 150 किलोमीटर अंतरावर आहे. अमरावती, बडनेरा आणि नवीन अमरावती रेल्वेस्थानके नाना प्रश्‍नांनी वेढलेली आहेत. एवढेच काय, तर चांदूरबाजार ते भुसावळ हे अंतर तब्बल 271 किलोमीटर एवढे पडते. भुसावळ विभागात 1028.36 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग आहे. त्यामुळे भुसावळ विभागावर प्रशासकीय समन्वय राखण्यात मोठ्या अडचणी येतात. त्यामुळे भुसावळ विभागातील सहा रेल्वेस्थानके कमाल 150 किलोमीटर अंतरावरील नागपूर विभागाला जोडली तर सर्वच प्रश्‍न प्रशासकीय नियंत्रणामुळे सुटू शकतात. भुसावळ विभागात अंदाजे 272 स्थानकांचा, तर नागपूर विभागात फक्त 91 स्थानकांचा समावेश आहे. त्यामुळे भुसावळमधील सहा स्थानकांचा समावेश नागपूर विभागात करणे सोयीचेच ठरणार आहे.

मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील बडनेरा हे मध्य रेल्वेतील अत्यंत महत्त्वाचे स्थानक आहे. त्यानंतर मॉडेल स्थानकाच्या रूपाने अमरावती रेल्वेच्या नकाशावर आले. अमरावतीला मॉडेल स्थानकाचा दर्जा मिळाला. सात नव्या रेल्वेगाड्यादेखील सुरू झाल्या. परंतु, मॉडेल स्थानकावर घोषित केलेल्या सोयी, सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. हीच परिस्थिती बडनेरा स्थानकाची आहे. विशेष म्हणजे, 133 किलोमीटर लांबीचा अमरावती-नरखेड रेल्वेमार्ग तयार करण्यात आला. या मार्गावरील चांदूरबाजारपर्यंत मध्यरेल्वेच्या भुसावळ विभागाची हद्द असून, तेथून पुढे नरखेडपर्यंत नागपूर विभागाची हद्द आहे.
मॉडेल स्थानकातून नरखेड मार्गे जाणाऱ्या अनेक गाड्या प्रस्तावित आहेत. परंतु, अमरावती-नवी अमरावतीला जोडणाऱ्या "कॉर्ड लाइन'चादेखील अद्याप पत्ता नसल्याने बडनेरा-नागपूर मार्गावर काही अघटित घडल्यास पर्यायी मार्ग म्हणून अमरावती-नरखेडचा वापर केला जातो.

दबाव हवा
कुठले रेल्वेस्थानक कोणत्या विभागात असावे, याचा निर्णय "रेल्वे बोर्ड' घेते. त्यामुळे नेत्यांनी दबाव आणल्यास नागपूर विभागात समावेश करणे सहज शक्‍य आहे.

सहाही स्थानके नागपूर विभागात समाविष्ट करावी, ही रास्त मागणी आहे. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू.
- देवेंद्र फडणवीस, आमदार आणि प्रदेशाध्यक्ष, भाजप

या आहेत समस्या...

* अमरावती (मॉडेल) : चार फलाट-एकच अंडरपाथ वे, फुट ओव्हरब्रिज, उद्‌घोषणा यंत्रणा, दुकाने, सायकल स्टॅंड, वाहन चोऱ्यांवर अंकुश, पुरेसे मनुष्यबळ, राजापेठ उड्डाणपूल, वॉशिंग-सायडिंग दिवास्वप्नच

* बडनेरा : कायम अस्वच्छता, निसरडा फुट ओव्हरब्रिज, मनुष्यबळाची कमतरता, ठोस नियंत्रणाचा अभाव

* नवीन अमरावती (नरखेड मार्ग) : प्रस्तावित गाड्या सुरू नाही, आरक्षण सुविधा नाही, खानपान व्यवस्था