Indian Railways News => Topic started by greatindian on May 01, 2012 - 00:00:26 AM


Title - रेल्वे अपघातात तरुणाने गमावला पाय
Posted by : greatindian on May 01, 2012 - 00:00:26 AM

मुंबई- मध्य रेल्वेवरील सॅंडहर्स्ट रोड स्थानकात आज दुपारी धावती लोकल पकडताना पाय घसरून रेल्वेगाडी आणि फलाटामधील पोकळीत अडकून पडलेल्या 20 वर्षांच्या तरुणाला पाय गमवावा लागला. या तरुणावर भायखळा येथील जे. जे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

डोंगरी येथे राहणारा अदनान आसिफ सांगी (20) हा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी ठाण्याला जाण्यासाठी आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सॅंडहर्स्ट रोड स्थानकात आला. फलाटावरून सुटलेली लोकल पकडण्याच्या प्रयत्नात असतानाच डब्याच्या दारातील खांबावरील त्याची पकड सुटली. त्यामुळे तो लोकल आणि फलाट यांच्यातील पोकळीत पडला आणि चाकाखाली येऊन त्याचा पाय गुडघ्यापासून वेगळा झाला.

जखमी झालेल्या अदनानला त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या प्रवाशांनी पोलिसांच्या मदतीने जे. जे. रुग्णालयात दाखल केले. तेथील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेबाबत रेल्वेस्थानकावरील प्रवाशांनी हळहळ व्यक्त केली. गावी गेलेले अदनानचे आई-वडील मुंबईला परत येत असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.